धोलावीरा : हडप्पाशी नातं

जगातील सर्वात पहिले खासगी शौचालय कुठे बांधण्यात आले?

जगातील पहिले क्रीडांगण आणि रस्त्यावरील सर्वात जुने फलक व माहिती कुठे होते?

       हे सर्व कच्छ येथील राज्य महामार्गाजवळ गाडले गेले होते . देशाच्या सीमेकडे नेणारा हाच तो महामार्ग त्याच्या दुतर्फा लांबच लांब केवळ कच्छचे रणच पसरलेले आहे. दूरवर पसरलेल्या या रणात एकही झाड दिसत नाही. गुजरातच्या अगदी टोकाचा हा असा सीमावर्ती भाग आहे, जिथे अरबी समुद्राने आपल्या वालुकामय लांब बोटांनी दूरपर्यंत कच्छच्या आखाताला कवेत घेतले आहे. इथेच जमिनीच्या उदरात कोण्या एका काळी 'धोलावीरा नगरी' आहे हे कालौघात विस्मरणात गेले आहे.

बहुतेक पर्यटक कच्छ-भुज आणि शासनाच्या आधारावर उभ्या असणार्‍या आसपासच्या गावांना भेटी देतात. परंतु त्यातील फारच कमी लोक धोलावीरा पर्यंत जाऊन पोहोचतात.

 हीच ती जागा आहे जिथे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडातील नागरी संस्कृतीचा उगम झाला होता. एक दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा येथे संस्कृती पुन्हा पुन्हा उदयाला आली, विकसित झाली आणि लयाला हि गेली. ज्यांना आपण हडप्पण म्हणतो. त्या लोकांनी सात वेळा तितक्याच धडाडीने याच ठिकाणी विविध शैलीत त्यांची घरे बांधली, अप्रतिम राज्यव्यवस्था, जलव्यवस्थापन नगररचना येथे निर्माण केली .आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही माणसे येथे अत्यंत शांततेत राहिली येथे कोणत्याही प्रकारचे युद्ध लढले गेले नाही. निदान तसे पुरावे तरी मागे राहिलेले नाहीत.

धोलावीरा मध्ये तुम्ही कोरडी पडलेली जलसाठ्यांची कृत्रिम तळी पाहत पाहत पुढे जाता. त्यांची खोली आणि भव्यता अनुभवता आणि लगेचच समोर एक दगडी भिंत उभी राहते. हा कधीकाळी शहराच्या तटबंदीचा भाग होता. त्याला लागूनच एक उत्तुंग प्रवेशद्वार अद्यापही खडे असलेले तुमच्या नजरेस पडेल. येथे राहणार्यांचे जीवन शांततामय होते तरीही ते बाहेरून अचानक होणाऱ्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी योग्य नियंत्रण यंत्रणा उभारायला विसरले नव्हते. याचे स्मरण ही तटबंदी आणि हे नागमोडी प्रवेशद्वार करून देते.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी येथे चुनखडी आणि वाळूच्या खडकांचा वापर करून घरे बांधण्यात आली आहेत. हे खडक मैलोनमैल दूरवरच्या खाणींमधून आणून त्यांना योग्य आकार देऊन गणिती शास्त्राप्रमाणे ते खांबाच्या खाच्यात बसविण्यात आलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या पायाभरणीत आणि उंचावटयांमध्येही अशीच रचना आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वीच्या भल्या मोठ्या विहीरीतून पाणी वर खेचणाऱ्या दोरांमुळे पडलेले चर रावजीभाई सोलंकी तुम्हाला दाखवितात आणि तुम्ही थक्क झाल्याविना राहत नाही. रावजीभाई 1989 पासून येथे सुरू झालेल्या उत्खननात सहभागी झाले आहेत.

अशाप्रकारे तुम्हाला थक्क करणाऱ्या येथे अनेक गोष्टी आहेत.
पहिले जलसंचयक हे या प्राचीन शहरातील थक्क करणाऱ्या इतर 16 गोष्टींपैकी एक आहे. पावसाचे पाणी आणि पावसात वाहणाऱ्या मनहार आणि मनसार या नद्यांचे पाणी मोठ्या कौशल्याने कालव्याच्या माध्यमातून आणून या जलसंचयकामध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे कृत्रिम विहिरींमध्ये रूपांतर होत असे. या कृत्रिम विहिरीतून पाणी पुढे भूमिगत शीत टाक्यांमध्ये नेण्यात येत असे. जेथे पाण्याचे शुद्धीकरणही होत असे. या शित टाक्यांची घडण वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात पाणी गार करण्यासाठी दगडांच्या लादयांचा वापर करण्यात आलेला आहे. आणि त्यावर मातीचा गिलावा ही करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी शुद्ध आणि थंडगार मिळत असे. अशाच प्रकारे विहिरीतून निघणारा आणि आणखी एक कालवा साठवलेले पाणी भूमिगत कृत्रिम सरींकडे नेतो. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही हडप्पावासीयांना पावसाच्या सरींचा आनंद लुटता येत असे किंवा याचा वापर धार्मिक स्नानसंध्येसाठीही त्याचा वापर करण्यात येत असे.
विशेष म्हणजे हे स्नानगृह वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी येथील एक दगडी फरशी काढण्याची सोयही करण्यात आले होती. हे सर्व अशा भागात बनविण्यात आले आहे जेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान केवळ दोनशे मिलिमीटर आहे.

या शहराची सुनियोजित रचना पाहता आजच्या भारतातही असे शहर अस्तित्वात नसल्याचे आश्चर्य वाटते. त्यामुळेही धोलावीराचा शोध लागल्याबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा. काळाचा इतका मोठा प्रवाह उलटून गेल्यानंतरही ही नगरी तितकीच अप्रतिम तितकीच भव्य वाटावी यातच या प्राचीन नगरीचे यश आहे. इथली थोडी वाळू चाळून पाहिले तर तुम्हाला लहान मनीसदृश्य पदार्थ मिळतील. ही लालभडक गोमेदाचीच (मौल्यवान खडे) त्याकाळची आवृत्ती आहे. धोलावीरातून त्याकाळी गोमेदाची निर्यात होत होती. आणखी नीट निरीक्षण केले असता भाजक्या मातीच्या सुंदर गुलाबी बांगड्यांचे अवशेष येथे सापडतील. या नाजुक बांगड्यांवर खाचा पाडून केलेली कलाकुसर ही अप्रतिम आहे. मात्र धोलावीरा येथे डॉ.आर.एस.बिश्त आणि त्यांच्या चमूने तब्बल 15 वर्षे केलेल्या अविश्रांत श्रमामुळे आपल्याला येथील हजारो वर्षापूर्वीच्या गोष्टीची एक झलक तरी निश्‍चितच मिळू शकते. आणि घर आणि शौचालय असलेली तीन ते चार चौकोनी खोल्यांची घरे आता इथे सहज पाहायला मिळू शकतात. सिंधू संस्कृतीतील सांडपाण्याच्या विल्हेवाटीच्या उत्कृष्ट यंत्रणेचा नमुना येथे पाहायला मिळतो. सांडपाण्याची भांडी प्रत्येक घराच्या बाहेर पाहायला मिळतात. सुनियोजित नाले, सरळ आणि बंदिस्त गटारे आणि यातून उत्सर्जित होणारे पदार्थ शहरापासून दूरवर वाहून नेणारी यंत्रणा, अशी सगळी व्यवस्था येथे होती. तुम्हाला धोलावीरा च्या स्वच्छतेच्या सवयीत कोठेही त्रुटी आढळणार नाही. ते सुद्धा अशा काळात जेव्हा बाकीच्या जगाला बहुदा नियमित आंघोळ, वैयक्तिक स्वच्छता आणि खाजगी शौचकुप यांचे महत्त्वही पटायचे होते.

धोलावीरा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा म्हणून आपल्यासाठी भांडी, मातीच्या आकृती, हस्तिदंती, मनी अशा अनेक गोष्टी मागे ठेवून गेले आहेत. पण असे मोठे जलसंचयक अंतर्गत जोडणी असलेले कालवे, गणितीयदृष्ट्या अचूक प्रमाणात तयार करण्यात आलेल्या विटांपासून ते मन्यांपर्यंतच्या सर्व गोष्टी आदीसाठी आवश्यक शास्त्रीय ज्ञान त्यांच्याकडे आले कुठून ? ते व्यापार करायचे आणि त्या व्यापाराच्या विस्ताराने मेसोपोटामिया आणि इजिप्तपर्यंतचा भागही व्यापला होता. कदाचित या भागात त्यांनी आपल्या वसाहती ही स्थापन केल्या होत्या. पण त्यातही इतक्यात दूरवरच्या दळणवळणाचे कौशल्य त्यांनी कसे निर्माण केले, हेही अकलनापलीकडचे आहे.

फलक:

ढोलवीरा शहराभोवती ची दगडी तटबंदी थक्क करून सोडते. इथले अप्रतिम आणि अवाढव्य जलकुंभक पाहताना तर दमछाक होते परंतु तरीही तसेच चालत पुढे पूर्वेकडील दरवाजापर्यंत जा आणि इथे आणखीन एक जगातील पहिली गोष्ट तुमची वाट पाहत आहे. ती म्हणजे मोठाले फलक (साईन बोर्ड) सुमारे दहा फूट लांबीचे हे फलक ज्यावर तितकाच मोठा मजकूर लिहिलेला आहे. ते सध्या झाकून सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. कोण्या एका काळी हे फलक काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगणारे असावेत. 'नगरीत प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत', किंवा कदाचित महत्त्वाच्या व्यक्तींची घरे असल्याची माहिती नेमके काय हे सिंधू लिपीचा उलगडा होत नाही तोपर्यंत कुणीच सांगू शकणार नाही.

क्रीडांगण :

आता जरा या नगरीतील क्रीडांगणाकडे वळूया. बैठकीची व्यवस्था असलेले भलेमोठे पटांगण ! इथे धोलावीरा कशासाठी यायचे? खेळाचे उपक्रम? बैलगाडीची शर्यत? की जगभरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी येथे औद्योगिक प्रदर्शने भरायची ?यापैकी एखाद्या किंवा सर्वच गोष्टी येथे होत होत्या असतील. अशा प्रमाणबद्ध मापाचे आणि विस्तृत असे हे जगातील पहिलेच ज्ञात क्रीडांगण आहे.

 आता पुन्हा एकदा प्रवेशद्वारापाशी येऊया. येथे उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे एक छोटेखानी प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. त्यात आपण लुडो नावाचा बैठा खेळ खेळतो, तशा प्रकारच्या खेळाच्या सोंगट्या-फलक ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सध्याचा लुडो आणि त्या काळचा, त्यात फारच कमी फरक असावा. येथील उत्खननात सापडलेल्या बऱ्याचशा गोष्टी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. आश्चर्य म्हणजे या गोष्टींचे सध्या जगातील तत्सम गोष्टींशी विलक्षण साम्य असल्याचे दिसून येते.

 एकेकाळची इतके प्रगत संस्कृती का लयाला गेली? माणूस म्हणून आपण या संस्कृतीच्या नेत्रदीपक प्रगतीबद्दल इतके कमी का जाणतो ? इतके प्रगत हडप्पण पुन्हा प्राथमिक मनुष्य जीवन का जगू लागले? आपली गुणसूत्रे त्या हडप्पण लोकांशी मिळतीजुळती असतील का? आपण खेळलेल्या बुद्धिबळाचा खेळ आपल्याला जसा किंचितसा आठवतो तसा काही लपलेल्या आठवणी आपल्यात आहेत का? हडप्पन रहात असलेल्या भागातच निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आपल्यासारख्या काही लोकांमध्ये अजूनही हरपण चालीरीती अस्तित्वात आहेत का?
 खुप खुप प्रश्न आहेत उत्तरे मात्र अगदीच थोडी आहेत.

अपर्णा जोशी / अनुवाद : संकेत सातोपे
संकलन : सुमित रवि सरवदे.

Comments